
मुंबई : मुंबईतील विविध समस्या आणि मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी जनतेसाठी आम्ही एकत्रितपणे म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी म्हणून काम करायला हवे, असे विधान केल्याने ठाकरेंचा फडणवीसांशी सलोखा वाढत असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
हिवाळी अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले. त्यापाठोपाठ आदित्य ठाकरे यांनी तिसऱ्यांदा फडणवीस यांची भेट घेत मतदारसंघातील समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विरोधक म्हणून आम्ही काही प्रश्न त्यांच्याकडे मांडत असू, तर त्यात काहीच चुकीचे नाही. जनतेसाठी आम्ही एकत्रितपणे म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी म्हणून काम करायला हवे, असे ते म्हणाले.



