
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीच्या अभिषेक सोहळ्याचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे. येत्या ११ ते १३ जानेवारी दरम्यान हा सोहळा होणार असून, मागील वर्षी सामान्य नागरिकांना अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे यंदा या सोहळ्यात सामान्यांनाही उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच सुमारे ११० निमंत्रित अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचाही निमंत्रितांमध्ये समावेश आहे.
अयोध्येतील अंगद टिला भागात ‘जर्मन हँगर’ पद्धतीचे तंबू उभारण्यात आले आहे, ज्यामध्ये ५ हजार नागरिक बसू शकतात. मंडप आणि यज्ञशाळेत शास्त्रीय सांस्कृतिक कार्यक्रम, विधी आणि दैनंदिन रामकथा प्रवचनांचा समावेश असलेल्या या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, की ‘ट्रस्टने गेल्या वर्षी अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहू न शकलेल्या सर्वसामान्यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना अंगद तिला येथील तीनही दिवसांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली जाईल.’
या सोहळ्यासाठी ११० अति महत्त्वाच्या अतिथींना निमंत्रण पत्रिका वितरीत करण्यात आल्या आहेत. यज्ञस्थळी सजावट आणि उत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती ट्रस्टतर्फे देण्यात आली.




