
पुणे : भारतीय टपाल विभागाने आधुनिक डिजिटल युगाशी नाते सांगत कागदविरहीत केवायसी प्रक्रियेसह, आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरणाच्या वापरास सुरुवात केली असून ग्राहकांना त्यांचे टपाल कार्यालय बचत खाते उघडणे तसेच या खात्यामध्ये सुरक्षित आणि जलद व्यवहार करणे सोयीस्कर होणार आहे.
या उपक्रमाची माहिती देताना पुणे क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यामध्ये ग्राहकांना आधार आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरून त्यांचे एकल टपाल कार्यालय बचत खाते उघडता येणार आहे. तसेच कितीही रक्कम खात्यामध्ये भरण्यासाठी आणि पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यासाठी देखील केवळ खाते क्रमांक आणि बोटांचे ठसे द्यावे लागणार आहेत.त्यामुळे ग्राहकांची सही न जुळणे, अयोग्य व्यक्तीला पैसे जाणे या समस्यांचे निराकरण होण्यास मदत होईल. टपाल विभागाच्या या डिजिटल उपक्रमामुळे ग्राहकांचे बँकिंग अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि प्रभावी होईल.
आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरणामुळे ग्राहकांचे टपाल खाते डिजिटल पद्धतीने सुसज्ज आणि संपूर्णपणे सुरक्षित असेल.’ग्राहक टपाल बचत खाते हे बँकेच्या खात्याला आधार सीडिंग करून घेत हे खाते लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, पीएम किसान सन्मान योजना, मातृवंदना योजना अशा थेट लाभ हस्तांतरणासाठी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) उपयोगात आणू शकतात. तसेच टपाल कार्यालय बचत खाते स्वत:च्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या खात्याला जोडून घरबसल्या पैसे काढणे, पैसे जमा करणे, खात्याचा तपशील मिळवणे अशा विविध डोअरस्टेप बँकिंग सेवांचा लाभदेखील घेऊ शकतात. यासंदर्भात अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी आपल्या नजीकच्या टपाल कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जायभाये यांनी केले.



