मुंबई : मंत्रीपदी असतानाही शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट हे ‘सिडको’च्या अध्यक्षपदी कायम कसे, असा प्रश्न मंत्रालयात उपस्थित करण्यात येत आहे. शिरसाट यांनी ‘सिडको’मध्ये निर्णयांचा ‘धडाका’ लावल्याने त्यांना अध्यक्षपदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महायुती सरकारच्या काळात मंत्रीपदाकडे आस लावून बसलेल्या संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अनुक्रमे ‘सिडको’ आणि राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदावर वर्णी लावली होती. तसेच या दोघांनाही मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. महायुती सरकारमध्ये शिरसाट आणि गोगावले या दोघांचीही मंत्रीपदी वर्णी लागली. शिरसाट यांच्याकडे(पान ४ वर)(पान १ वरून) सामाजिक न्याय हे खाते सोपविण्यात आले मंत्रिपदी निवड झाल्यावर शिरसाट यांनी ‘सिडको’चे अध्यक्षपद सोडणे अपेक्षित होते. पण शिरसाट यांना ‘सिडको’चे अध्यक्षपद सोडवेना. सामाजिक न्यायमंत्री असले तरी नगरविकास खात्याच्या अधिपत्याखालील सिडकोच्या बैठका घेऊन निर्णयांचा धडाका त्यांनी लावला आहे. भरत गोगावले हे एस. टी. मंडळाच्या अध्यक्षपदी आता कायम राहिलेले नाहीत. पण शिरसाट अजूनही दोन पदे भूषवित आहेत.
नियम आणि संकेतानुसार मंत्रीपदी विराजमान झालेल्या व्यक्तीने मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित असतानाही शिरसाट मात्र महिनाभराहून अधिक काळापासून दोन्ही पदावर कार्यरत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्र्याना लाभाचे पद धारण करता येत नाही. मात्र सिडको हे लाभाचे पद नसल्याचा दावा करीत शिरसाट अध्यक्षपदावर ठाण मांडून बसले असून संचालक मंडळाच्या बैठका घेत निर्णय जाहीर करत आहेत. शिरसाट यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही ३० डिसेंबर रोजी सिडकोच्या संचालक मंडळाची बैठक घेऊन मेट्रो प्रकल्प, महाराष्ट्र भवन यासह अनेक विषयावर निर्णय घेतले. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्याचे संकेत देत याबाबत लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र एकच व्यक्ती दोन पदावर राहणे, लाभाचे पद उपभोगणे उचित नसल्याबाबत मुख्यमंत्र्याकडे तक्रारी करण्यात आल्यानंतर सिरसाट यांना अध्यक्षपदावरुन त्वरित दूर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागास दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर शिरसाट यांना अध्यक्षपदावरुन हटविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेत एक व्यक्ती , एक पद हे सूत्र राबविले जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये जाहीर केले असले तरी अजूनही शिरसाट अध्यक्षपदावर ठाण मांडून बसले आहेत.



