
नाशिक, नंदुरबार, मुंबई, नागपूर : मकरसंक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे तिघांचा मृत्यू झाला. त्यात नाशिक आणि नंदुरबार , अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मुंबईत बेकायदा नायलॉन मांजा विरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहिम राबवली. त्यात १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान ३५ हजार किंमतीचा नायलॉन मांजा व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.
नाशिक येथे दुचाकीस्वार युवकाचा गळा मांजामुळे कापला गेला. तर नंदुरबारमध्ये सात वर्षाच्या बालकाचा आजोबांबरोबर दुचाकीने जात असताना मांजा गळ्यात अडकून मृत्यू झाला. विदर्भात अकोला शहरात मांजामुळे दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी अकोला शहरातील उड्डाणपुलाजवळ घडली. किरण प्रकाश सोनोने असे मृताचे नाव आहे.
उत्तर महाराष्ट्रात मंगळवारी सातपेक्षा अधिक जण जखमी झाले. सोनू धोत्रे हा (पान ४ वर)(पान १ वरून) युवक दुचाकीने पाथर्डी फाटा-वडनेरमार्गे जात होता. नायलॉन मांजा अडकल्याने त्याच्या गळ्यास दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सोनू हा संक्रातीसाठी गुजरातहून नाशिक येथे घरी आला होता. मे महिन्यात त्याचा विवाह होणार होता. नंदुरबार येथे सात वर्षाचा कार्तिक गोरवे हा आजोबांबरोबर दुचाकीने जात असताना मांजामुळे गळा चिरला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात पतंग उडवितांना दुसऱ्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने सात वर्षाचा श्लोक गिरगुणे हा मुलगा जखमी झाला.
अकोल्यात दुसऱ्या घटनेत एका व्यावसायिकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तर नागपुरात दुचाकीने कर्तव्यावर जाणाऱ्या शीतल खेडकर या महिला पोलीस जखमी झाल्या.
मुंबई पोलिसांनी १० ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत बेकायदेशीर नायलॉन मांजाच्या वापराबाबत विशेष मोहिम राबवली. त्या मोहिमेदरम्यान १९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कारवाईत १९ व्यक्तींना अटक करण्यात आले आहे अथवा नोटीस देण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर व्यापारात सहभागी असलेल्या इतर आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.



