पुणे : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मीक कराड याचा हात असून, त्याने दहशतीच्या जोरावर कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याचे समोर येत आहे. असे असतानाही कराड याची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी का केली जात नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कराड प्रकरणात कोणतेही राजकारण न करता सामाजिक जबाबदारी म्हणून सत्ताधारी पक्षाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही सुळे यांनी केली.
बारामती लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी खासदार सुळे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या बरोबर बैठक घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, ‘देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मीक कराड पसार होता. २१ दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. कराडच्या संपत्तीबाबत दररोज नवीन माहिती उजेडात येत आहे. पोलिसांनी कराडची किती बँक खाती लाखबंद केली, त्यांमध्ये नक्की किती रक्कम होती, याची संपूर्ण माहिती समोर येणे आवश्यक आहे.’ ‘केवळ ऐकीव माहितीच्या आधारे यापूर्वी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक आणि इतर नेत्यांची ईडीची चौकशी लावली. मग कराडची ईडी चौकशी का होत नाही, असा प्रश्नही खासदार सुळे यांनी उपस्थित केला.
वाल्मिकची वाकडमधील सदनिका लाखबंद!
पिंपरी : वाल्मीक कराडची वाकड येथील सदनिका लाखबंद (सील) करण्यात येणार आहे. या सदनिकेचा एक लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. वाकड येथील पार्क स्ट्रीट गृहनिर्माण सोसायटीच्या आयव्हरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ६०१ क्रमांकाची सदनिका वाल्मीक आणि त्याची पत्नी मंजली कराड यांच्या नावावर आहे. ही सदनिका लाखबंद केली जाणार आहे. थकबाकी न भरल्यास मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.



