शिर्डी : राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) दोन दिवसीय अधिवेशन शिर्डीत १८ व १९ जानेवारी रोजी होत आहे. ‘अजितपर्व, दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची!’ असे घोषवाक्य असलेले हे शिबिर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पक्षसंघटन, तसेच सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात शिबिरातून होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गटाचे प्रथमच अधिवेशन होत आहे. पक्षाचे आजी-माजी आमदार, नऊ मंत्री, तालुका व जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांचे प्रमुख असे एकूण सुमारे ५०० पदाधिकारी शिबिरास उपस्थित राहतील. २०२२ मध्ये एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीत अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या अधिवेशनातून अजित पवार निघून गेल्याची चर्चा अधिक रंगली होती. राष्ट्रवादीच्या फुटीची सुरुवात शिर्डीपासूनच झाल्याचे मानले जाते. या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वतंत्र अधिवेशन होत आहे. अधिवेशनात अजित पवार हे पहिल्यांदा आपली सदस्य नोंदणी करतील. त्यानंतर राज्यभरातील सभासद नोंदणीस प्रारंभ होईल.



