
पुणे : अंधाराचा फायदा घेऊन ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात चालविणाऱ्या टोळीचा सहकारनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीचे दिल्ली, उत्तर प्रदेश ते गाझियाबाद असा संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी, पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडील १० लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या २ हजार ७० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार अमोल पवार आणि महेश मंडलिक हे गस्तीवर होते. पुणे-सातारा रोडवरील पद्मावती बस थांब्यासमोर आरोपी घाईने स्वारगेटच्या दिशेने जात होता. पोलिसांना त्याचा संशय आला आणि त्यांनी आरोपीला पाठलाग करून पकडले. चौकशी केली असता आरोपीकडे ५०० रुपयांच्या २५० बनावट नोटा सापडल्या. यानंतर पोलिसांनी मुंबईतील तिघांना अटक केली.
या आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच नोटा दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून आल्याचे समजले. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे, सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक बापु खुटवड, कर्मचारी किरण कांबळे, चंद्रकांत जाधव,बजरंग पवार, अमित पदमाळे, सागर सुतकर, अभिजित वालगुडे, योगेश ढोले, महेश भगत यांच्या पथकाने केली.




