कोल्हापूर : इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट भारत येत्या दोन महिन्यांत साध्य करेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली. या घोषणेचे साखर उद्याोगातून जोरदार स्वागत होत आहे.
देशातील साखर उद्याोग अतिरिक्त साखर उत्पादनामुळे गेल्या काही वर्षांत आर्थिक अडचणीत आला आहे. यावर मार्ग म्हणून केंद्राने उसापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले. यासाठी कारखान्यांना अल्प व्याजदराने अर्थसहाय्य केले. खेरीज, इथेनॉल पुरवठा केल्यानंतर त्याची देयके २१ दिवसांमध्ये कारखान्यांना मिळू लागल्याने आर्थिक बोजा काही अंशाने हलका झाला. मात्र, या इंधनाची मागणी वाढण्यासाठी त्याचे इंधनात २० टक्के मिश्रणाचे धोरण अद्याप शंभर टक्के राबवले जात नव्हते. हे राबवले जावे, अशी मागणी देशांतर्गत साखर उद्याोगातून होत होती.
देशांतर्गत इथेनॉल निर्मिती अधिकाधिक वाढावी आणि त्याचा वापर इंधनात जास्तीत जास्त व्हावा, ही भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सातत्याने मांडली आहे. दोन वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या साखर परिषदेत त्यांनी ही भूमिका अधोरेखित केली होती.



