मुंबई: अनुकूल बातम्यांच्या ओघ सुरु राहिल्याच्या सुखद प्रभावाने भांडवली बाजारात गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टीने आगेकूच कायम ठेवली. कंपन्यांच्या तिमाही निकालातील चांगली कामगिरी, इस्त्रायल-हमास युद्धविराम, हिंडेनबर्ग रिसर्चला टाळे लावण्याची संस्थापक अँडरसन यांची घोषणा आदींचा अनुकूल परिणाम बाजारावर दिसून आला. तरी परकीय गुंतवणूकदारांच्या विक्री करून माघारीचा ताणही बाजाराच्या अस्थिर वळणाने दाखवून दिला.
सेन्सेक्स आणि निफ्टीने सकाळच्या सत्रातच अनुक्रमे ७७,००० आणि २३,३०० या महत्त्वाच्या पातळ्यांपुढे मजल मारली. अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवरील बुधवारी दोन महिन्यांतील सर्वोत्तम तेजी, त्या परिणामी पहाटे खुल्या झालेल्या आशियाई बाजारांमध्ये दिसून आलेली झेप याचेच प्रतिबिंब सेन्सेक्स-निफ्टीच्या उसळीत दिसून आले. सकाळची ही दमदार सुरुवात, दिवसभर चढ-उतारांनंतरही सत्रअखेरपर्यंत कायम टिकून राहिली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसअखेर ३१८.७४ अंशांच्या वाढीसह, ७७,०४२.८२ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील दिवसअखेर ९८.६० अंशांच्या वाढीसह २३,३११.८० या पातळीवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी बुधवारच्या सत्रातही साधारण ०.३० टक्क्यांची वाढ साधली होती. मुंबई शेअर बाजारात १,३११ घसरणाऱ्या समभागांच्या तुलनेत, २,६८८ असे वाढणाऱ्या समभागांचे पारडे जड ठरले. स्मॉलकॅप व मिडकॅप या विस्तारीत निर्देशांकांनी अनुक्रमे १.१ टक्के आणि १.८ टक्के अशी सरस वाढ दर्शवून, बाजारात सर्वव्यापी खरेदी सुरू राहिल्याचे संकेत दिले.



