दिल्ली येथील भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो-2025मध्ये कंपनीने हायड्रोजन, इलेक्ट्रिक आणि सीएनजी इंधनावर चालणारी पर्यावरणस्नेही वाहने सादर केली. यात सादर करण्यात आलेल्या हायड्रोजन इंधनावरील प्राईमा ट्रकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या (आयओसी) सहकार्याने हायड्रोजन इंजिनवर चालणार्या या ट्रकची चाचणी केली जाणार आहे. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनचा हा एक भाग आहे.
आर्थिक वर्ष 2026 मध्ये टाटा प्राईमा एच-28 हा हायड्रोजनवरील ट्रक विक्रीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. हा देशातील पहिला हायड्रोजन इंधनावरील ट्रक ठरणार आहे. या ट्रकला चार सिलिंडरचे एच-2 आयसीई इंजिन असेल. याची क्षमता 550 किलोमीटर इतकी आहे.
याबाबत माहिती देताना टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक आणि व्यावसायिक वाहन विभागाचे प्रमुख गिरीश वाघ म्हणाले, हायड्रोजन इंधनावरील ट्रकची चाचणी घेण्यासाठी तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गांवर 15 ट्रक धावतील. हायड्रोजन इंधन भरण्याच्या सुविधांचीही यावेळी चाचणी होईल. याशिवाय हायड्रोजन स्टेशन्सच्या उभारणीवरही या काळात काम केले जाईल. लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीत हायड्रोजन इंजिनावरील वाहनाचा उपयोग कसा वाढविता येईल, याचाही अभ्यास होईल.
वाहनाचे वैशिष्ट्य…
- टाटा प्राईमा एच-28 ट्रक संपूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालेल
- या वाहनाची अंदाजित रेंज
- 550 किलोमीटर आहे
- कृषी माल वाहतूक, औद्योगिक माल आणि सिमेंट वाहतुकीसाठी करता येईल वापर
- आरामदायी वाहतूक डोळ्यांसमोर ठेवून केली रचना
- ट्रकद्वारे होणार्या प्रदूषणापासून मिळणार मुक्ती


