सांगली : विट्याजवळ कार्वे औद्योगिक वसाहतीमध्ये सांगली पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) उत्पादन करणाऱ्या कारखाना उद्ध्वस्त करत २९ कोटी ७३ लाखांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी गुजरातच्या एका तरुणासह तिघांना अटक केली आहे. हे अमली पदार्थ या ठिकाणी तयार करून त्याची तस्करी केली जात होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.

याबाबत घुगे यांनी सांगितले, अमली पदार्थ तस्कारी, उत्पादन याची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची वेगवेगळी पथके पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी तैनात केली आहेत. या पथकातील संदीप टिगरे यांना कार्वे औद्योगिक वसाहतीतील रामकृष्ण माउली नावाच्या कारखान्यातून अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, विटा पोलीस ठाणा प्रभारी धनंजय फडतरे यांनी अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसह नेवरी रस्त्यावर सापळा लावला. या वेळी कारखान्यातून हुंडाई आय- २० (एमएच ४३ एएन १८११) ही मोटार बाहेर पडली. या मोटारीत चालकासह बलराज अमर कातारी (वय २४ रा. साळशिंगे रोड) याला ताब्यात घेऊन मोटारीची झडती घेतली असता आतमध्ये मेफेड्रोन या अमली पदार्थाची पांढरट, पिवळसर रंगाची भुकटी प्लास्टिक बॅगमधून नेली जात असल्याचे दिसून आले.