महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला गालबोट लागलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत दिलं आहे. मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक जमल्यानंतर ही घटना घडली.
मेळ्यातील विशेष कर्तव्यावरील अधिकारी आकांक्षा राणा यांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगम घाटावरील बॅरिकेट्स तुटल्याने काही लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नेमकी संख्या अद्याप आमच्याकडे नाही”, असे राणा यांनी पीटीआयला सांगितले.
घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल करण्यात आल्या असून जखमींना कुंभच्या सेक्टर २ मधील तात्पुरत्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चेंगराचेंगरीनंतर आजचे अमृत स्नान रद्द करण्यात आल्याचे आखाडा परिषदेने जाहीर केले. अधिकाऱ्यांनी भाविकांना संगमात स्नान केल्यानंतर जागा रिकामी करण्याचे आवाहन केले. तसंच, संगम घाटावर जाऊन स्नान न करण्याचे आवाहन करण्यात आले असून नजिकच्या इतर घाटावर जाऊन स्नान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




