मुंबई : मकोका लागलेल्या वाल्मिक कराड प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढतच चालला आहे. याचदरम्यान काल धनंजय मुंडे यांनी मुंबईत काल मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांसमोर आपली भूमिका मांडली आहे.
धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्ष आणि अजित पवार यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईल, तेच ठरवतील माझ्या विषयी काय करायचे, असं धनंजय मुंडे म्हणाले. तसेच धनंजय मुंडे यांनी वैयक्तिक काहीजण राग ठेवत आरोप करत असल्याचा खुलासा बैठकीत केला. काल रात्री अजित पवार समोरच धनंजय मुंडे यांनी भूमिका मांडताना होत असेलेल्या आरोपासंदर्भात सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांच्याविषयी आरोप केलेले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या भेटीविषयी माहिती अजित पवार यांनी सर्व पक्षाच्या आमदारांना दिली. तसेच अंजली दमानिया यांनी दिलेले सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्याचं अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत स्पष्ट केलं.
आतापर्यंत कोणा-कोणाची चौकशी झाली?
आतापर्यंत या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली. यात वाल्मिक कराड यांच्या पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची चौकशी झाली आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर केज पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा नोंद आहे. ज्याचा तपास सध्या सीआयडी तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित म्हणून एसआयटीकडून तपास सुरू आहे.



