
नवी दिल्ली : हाडाचा कर्करोग हा आजार होण्याचे प्रमाण कमी असल्याने त्याविषयी जागरूकता कमी आहे. कर्करोगाचे बरेच रुग्ण जबडा, स्तन, आतडे, गर्भाशय इत्यादी अवयवांच्या आजाराने बाधित असतात. या प्रकरणांच्या मानाने हाडांमध्ये हा आजार केवळ एक टक्का या प्रमाणात दिसतो.
इतर व्याधींबद्दल असलेली जागरूकता या आजाराच्या बाबतीत दिसून येत नाही. परंतु योग्य वेळेत योग्य उपचार योग्य पद्धतीने केल्यास इतर आजारांप्रमाणे हाडाचा कर्करोग पूर्णपणे बरा होण्यास मदत होते, असे डॉक्टर सांगतात.
आपल्या शरीरातील कोणत्याही भागात जर एखादी दुखणारी व न दुखणारी परंतु आकाराने वाढणारी गाठ आढळल्यास जागरूक व्हावे. अशी गाठ वा दुखणे तीन – चार आठवड्यांमध्ये शमले नाही, तर त्याचा पुढील तपास करावा. यामध्ये बऱ्याच गाठी साध्या स्वरूपाच्या आढळतात व त्याची चिंता नसते. मात्र गाठ वेगाने वाढते. त्यावेळी मात्र लवकरात लवकर तपासण्या सुरू कराव्यात.
या तपासण्यांमध्ये क्ष किरण तपासणी, एमआरआय स्कॅन छातीचा सिटी स्कॅन व बोन स्कॅन अथवा पीईटी स्कॅन करणे गरजेचे असते. या तपासण्यांमुळे आजाराचा शरीरातील त्या भागामध्ये व इतर अवयवांमध्ये किती प्रादुर्भाव झाला आहे हे कळते. हाडाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया योग्य प्रकारे योग्य प्रशिक्षण असलेल्या तज्ज्ञाकडून झाल्यास हात किंवा पाय वाचवता येतो, असे डॉक्टर सांगतात.




