अहिल्यानगर : महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं पैलवन शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) आणि महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) चांगलंच भोवलं आहे. या दोनही पैलवानांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे. त्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी ही माहिती दिली
आजच्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत एका मोठ्या वादाची घटना घडली, ज्यामुळे स्पर्धेच्या वातावरणाला गालबोट लागले. आज झालेल्या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ यांच्यासोबत झालेल्या लढतीत पैलवान शिवराज राक्षे यांनी पंचाच्या निर्णयाला विरोध केला आणि पंचांना लाथ मारण्याची घटना घडली. शिवराज राक्षे यांची पाठ टेकली नसताना पंचांनी निर्णय दिला, ज्यावर राग अनावरण करत त्यांनी धक्काबुक्की केली.
तर पृथ्वीराज मोहोळ यांच्यासोबत झालेल्या अंतिम लढतीत पै. महेंद्र गायकवाड यांनी निकालापूर्वीच मैदान सोडून बाहेर गेल्यामुळे त्यांनाही वादग्रस्त ठरवण्यात आले. या दोन्ही घटनांमुळे पैलवान शिवराज राक व महेंद्र गायकवाड या दोन्ही मल्लांना महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेने तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ यांना महाराष्ट्र केसरी किताबाने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा व थार गाडी भेट देऊन सन्मान करण्यात आला. दुसरीकडे महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेने घेतलेल्या या कडक निर्णयामुळे स्पर्धेच्या शिस्तीला महत्त्व देण्यात आलं आहे, आणि भविष्यात अशी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हे पाऊल उचललं गेलं आहे.



