यवतमाळ : Yavatmal Crime News | दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीचा डोक्यात दगड घालून निघृण खून केल्याची घटना घडली आहे. मीराबाई बालाजी जंगले (वय-२६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. यासबंधी मृत महिलेचे वडील नगुराव सीताराम कुरकुदे (रा-नागवाडी, ता. मसद, जि. यवतमाळ) यांनी गोकाक ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून गोकाक ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. त्यावरून बालाजी अप्पाराव जंगले (वय-३१, रा. टेंभूरदरा, ता. महागाव, जि. यवतमाळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथून गोकाक परिसरात ऊस तोडणी टोळ्या आल्या आहेत. या टोळीतील काहीजण ममदापूर येथील सिदलिंग तापशी यांच्या शेतवाडीत पाल उभारून राहात आहेत. मंगळवारी बालाजी हा सायंकाळी चारच्या सुमारास दारूसाठी पत्नीकडे पैशाची मागणी करू लागला.
त्यास तिने नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने दगड उचलून पत्नीच्या डोक्यात घातला. यातच मीराबाई हिचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित आरोपी बालाजी अप्पाराव जंगले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक सुरेशबाबू आर.बी. याच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण मोहिते अधिक तपास करीत आहेत.



