महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा आम्ही सर्वांनी अभ्यास केला. यामध्ये आम्हाला मततदार याद्यांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग आणि त्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हदेखील उपस्थित केले. ते दिल्लीत आज (दि.७) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्राच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा आम्ही अभ्यास केला. यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त आढळून आली. महाराष्ट्रात ५ महिन्यांत इतके मतदार कसे वाढले? असा सवालदेखील त्यांनी केला. याचवेळी हिमाचल प्रदेशमध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढेच मतदान झाले आहे, असेही स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.
आम्हाला नाव, पत्त्यांसह मतदार यादी द्या; विरोधी पक्षांची मागणी
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मतदार यादांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. आम्हाला नाव, पत्त्यांसह मतदार यादी हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आजच्या पत्रकार परिषदेत केली. निवडणूक आयोग याद्या का देत नाही?; असा सवाल केली. तसेच यावेळी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे आम्हाला महाराष्ट्र लोकसभा, विधानसभा निवडणूकांची फोटोंसह यादी मागितली आहे. परंतु निवडणुक आयोग आम्हाला या याद्या देत नसल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला.
आयोग ‘जिवंत’ असेल तर त्याने उत्तर द्यावे; खा. संजय राऊत
यावेळी बोलताना शिवसेना (यूबीटी) नेते खासदार संजय राऊत म्हणाले, “जर देशाचा निवडणूक आयोग ‘जिवंत’ असेल तर त्यांनी राहुल गांधीजींनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. पण, निवडणूक आयोग उत्तर देणार नाही कारण ते स्थापन झालेल्या सरकारचे गुलाम बनले आहेत. हे अतिरिक्त ३९ लाख मतदार कुठे जातील? ते बिहारला जातील. दिल्ली निवडणुकीत आम्ही त्यापैकी काही पाहिले आहेत. ते आता बिहार आणि नंतर उत्तर प्रदेशला जातील…”
‘तुतारी’ चिन्हाच्या गोंधळामुळे आम्ही ११ जागा गमावल्या…; खा. सुळे
राष्ट्रवादी एससीपी नेत्या खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या,, “…आम्हाला मतपत्रिकेवर पुन्हा निवडणुका घ्यायच्या आहेत जिथे आमचे उमेदवार जिंकले आहेत. ११ जागा अशा आहेत जिथे पक्षाच्या चिन्हांमधील गोंधळामुळे आम्ही निवडणुका गमावल्या. सत्तेत असलेल्या पक्षानेही हे मान्य केले आहे. आम्ही ‘तुतारी’ चिन्ह बदलण्यासाठी अनेक विनंत्या केल्या. परंतु निवडणुक आयोगाकडून विनंती मान्य करण्यात आली नाही… आम्ही फक्त निवडणूक आयोगाला निष्पक्ष राहण्याची मागणी करतो…”



