
जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे नियंत्रण रेषेवर (LOC) घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ पाकिस्तानींना भारतीय सैन्याने ठार केले. या घुसखोरांमध्ये पाकिस्तानच्या कुख्यात बॉर्डर अॅक्शन टीममधील दहशतवादीही समाविष्ट आहेत. यात अल-बद्र दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्कराच्या जवानांचा समावेश आहे. घुसखोरांमध्ये २ ते ३ पाकिस्तानी लष्करी सैनिकांचाही समावेश होता. अशी माहिती वृत्तसंस्था ‘एएनआय’ने त्यांच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करत दिली आहे.
भारतीय सैन्यावरील हल्ल्याचा कट उधळला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी घुसखोर कुख्यात बॉर्डर अॅक्शन टीमच्या मदतीने भारतीय सैनिकांवर हल्ला करू इच्छित होते. सीमा कृती पथकांना नियंत्रण रेषेवरून छुप्या पद्धतीने हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. या पाकिस्तानी एजन्सीने यापूर्वीही सीमेवर भारतीय सैनिकांवर हल्ला केला आहे. या अनुभवाचा फायदा घेत, या संघाला पुन्हा एकदा भारतीय सैनिकांना लक्ष्य करायचे होते.
पाकिस्तानचा काश्मीर बद्दल अपप्रचार
सूत्रांनी सांगितले की, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी घुसखोरांना दिसताच भारतीय सैनिकांनी त्यांना ठार मारले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये अल-बद्र या दहशतवादी संघटनेचे दहशतवादीही समाविष्ट आहेत. ही घटना त्या दिवशी घडली जेव्हा पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबद्दल आपला अपप्रचार पसरवत आहे आणि ५ फेब्रुवारी हा दिवस काश्मीर एकता दिन म्हणून साजरा करण्याचे नाटक करत आहे.




