नाशिक : नाशिक येथे स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून आयोजित कृषी महोत्सवात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी हॉटेलमध्ये मिळणारे पनीर दुधापासून नव्हे, तर व्हेजिटेबल ऑईलपासून तयार होते, असा खळबळजनक दावा केला.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, “मी कृषी मंत्री असताना पहिला कृषी महोत्सव सुरू झाला. शेतकऱ्यांच्या जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न अविरतपणे सुरू आहे.” सलग 14 वर्षांपासून हा महोत्सव सुरू आहे, ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
पाण्याच्या व्यवस्थापनावर भर
पाण्याच्या समस्येबद्दल बोलताना, मंत्री विखे पाटील म्हणाले, “आपले 60 टक्के कालवे गळके आहेत, शेवटपर्यंत पाणी जात नाही. शेतकऱ्यांची मागणी आहे त्यानुसार पाणी द्यावे लागणार आहे.” 65 टीएमसी पाणी पश्चिमेला वाहून जाते, ते वळविण्याचे काम करायचे आहे, ज्यासाठी 50 ते 60 हजार कोटींचे बजेट आवश्यक आहे.
नाशिक महापालिकेच्या पाणी वापरावर प्रश्नचिन्ह
नाशिक महापालिकेच्या पाणी वापरावर मंत्री विखे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. “नाशिक महापालिका पाणी वापरते, किती पाणी वाया जाते? किती पाण्याचा वापर होतो? किती पाणी पुनर्वापर केला जातो? याकडे आता लक्ष दिले जाणार आहे असं ते म्हणाले.
कीटकनाशकांच्या गुणवत्तेवर चिंता
नाशिकमध्ये सर्वात जास्त बोगस कीटकनाशके तयार होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना, मंत्री विखे पाटील म्हणाले, “रासायनिक खतांचा परिणाम नव्या पिढीवर होत आहे. सर्वात जास्त बोगस कीटकनाशके नाशिकमध्ये तयार होत आहे. यामुळे कर्करोगाचा आजार वाढतोय. जैविक खताचा वापर केला पाहिजे.”
दूध उत्पादनाच्या आव्हानांवर भाष्य
पुढील दीड वर्षात दूध उत्पादनाचे सर्वात मोठे आव्हान असणार असल्याचे सांगताना, मंत्री विखे पाटील म्हणाले, अमूलचा समूह राज्यातून 35 ते 40 लाख लिटर दूध खरेदी करतो. लोक म्हणतात गुजरातचे दूध बंद करा. मात्र, अमूलचा समूह आपल्याकडून दूध विकत घेतो म्हणून दूध संकलन टिकून आहे.



