बारावीच्या परीक्षेला (HSC Exam) उद्यापासून (मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025) सुरुवात होत आहे. यावर्षी दहा दिवस आधीच परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी पत्रकार परिषद घेऊन परीक्षेच्या तयारीबाबत माहिती दिली.
परीक्षा आणि निकालाबाबत महत्त्वाची माहिती
बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होत आहे. यावर्षी 10 दिवस आधी परीक्षा होत असल्याने, निकालही (Result) लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न असेल. 15 मे पर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याचे शरद गोसावी यांनी सांगितले.
एकूण विद्यार्थी: 15 लाख 5 हजार 37
मुले: 8 लाख 10 हजार 348
मुली: 6 लाख 94 हजार 352
तृतीयपंथी (Transgender): 37
शाखानिहाय विद्यार्थी संख्या:
विज्ञान (Science): 7 लाख 68 हजार 967
कला (Arts): 3 लाख 80 हजार 410
वाणिज्य (Commerce): 3 लाख 19 हजार 439
सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना 10 मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास, गैरप्रकारांना उद्युक्त करणारे आणि मदत करणाऱ्यांवर पात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे निगराणी ठेवली जाईल. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाईल. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएससह लाइव्ह ट्रॅकिंग आणि व्हिडिओ चित्रीकरण केले जाईल, अशी माहिती आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली आणि ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.



