
सिंधुदुर्ग : ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली, त्यावेळी शरद पवार यांची राजकीय पार्श्वभूमी पाहून, महाविकास आघाडी करताना विचार केला पाहिजे होता. आता महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर शरद पवार सत्ताधाऱ्यांचा सत्कार करत असतील तर त्यावर बोलून काही उपयोग नाही, असं वैभव नाईक म्हणाले. शरद पवार हे मुसद्दी राजकारणी आहेत, हे सर्वांना माहिती आहे. गेली 60 ते 70 वर्ष राजकारणात असून राज्यातील मोठं व्यक्तिमत्त्व आहे, असं वैभव नाईक म्हणाले.
नुकतंच शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावरुन ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर हल्लाबोल करत, पवारांचं हे कृत्य रुचलं नसल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन आता वैभव नाईक यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.
वैभव नाईक काय म्हणाले?
शरद पवार हे मुसद्दी राजकारणी आहेत. ज्यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली, त्यावेळी शरद पवार यांची (Sharad Pawar) राजकीय पार्श्वभूमी पाहायला हवी होती. आता महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर शरद पवार सत्ताधाऱ्यांचा सत्कार करत असतील तर त्यावर बोलून काही उपयोग नाही, असं वैभव नाईक म्हणाले.
राजन साळवी पक्षात राहायला हवे होते
राजन साळवी यांच्याशी मी स्वतः बोललो, तुम्ही शिवसेनेत राहा. आज वेळ वाईट असली तरी उद्या वेळ बदलेल. राजन साळवी यांनी सांगितल की पक्षांतील लोकांचा विश्वास नाही. मी विधानपरिषदेला मतदान केलं नसल्याचं काहींचं म्हणणं असल्याचं राजन साळवी बोलतात. राजन साळवी पक्षात राहिले पाहिजे होते.
कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक हे सामान्य घरातील असून, जनतेने त्यांना निवडून दिलं होतं. मात्र सत्ताधारी पक्षाकडून लाखो रुपयांचे आमिष दाखवून त्यांना फोडण्यात आलं. गेलेले नगरसेवक हे स्वतःच्या स्वार्थासाठी, आर्थिक फायद्यासाठी गेले. येणाऱ्या काळात सामान्य शिवसैनिकांना घेऊन शिवसेना उभी करू, असंही वैभव नाईक म्हणाले.
राणेंनी विरोधकांना संपवलं
नारायण राणे पालकमंत्री असताना देखील विरोधकांना संपविण्याचं काम 20 वर्षापूर्वी केलं, निधी देणार नाही म्हणत दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन बैठकीच्या बाहेर घालवण्यात आलं. मात्र ही परिस्थिती रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त दिवस टिकत नाही ही वस्तूस्थिती आहे, असं वैभव नाईक म्हणाले.
राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली!
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज दुपारी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राजन साळवी यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. आज अखेर हा पक्षप्रवेश होत आहे.


