
भारतीय रिझर्व्ह बँक नवी चलनी नोट आणणार आहे. ही चलनी नोट ५० रुपयांची राहणार असून यावर आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी राहणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संजय मल्होत्रा यांनी शक्तीकांत दास यांच्या जागी नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या संदर्भात त्यांच्या संकेतस्थळावर माहिती दिली आहे. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून लवकरच ५० रुपयांच्या नवीन नोटा जारी केल्या जातील. या नोटांवर आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या स्वाक्षरी असलेल्या ५० रुपयांच्या नोटा जारी करणार आहेत. या नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र कायम राहणार आहे. ही नवी नोट आधीच्या ५० रुपयांच्या नोटांसारखी राहणार असल्याचं, केंद्रीय बँकेने बुधवारी एका निवेदनात म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेने यापूर्वी जारी केलेल्या ५० रुपयांच्या सर्व नोटा कायदेशीर चलन म्हणून चालू राहणार आहे.
–कोण आहेत संजय मल्होत्रा ?
२०२२ मध्येच केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांना आरबीआय गव्हर्नर पदासाठी नामांकित केले होते. आतापर्यंत ते वित्तीय सेवा विभागाचे (DFS) सचिव म्हणून काम करत होते. संजय मल्होत्रा हे राजस्थान केडरच्या १९९० च्या बॅचचे वरिष्ठ अधिकारी आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये, त्यांना आरईसीचे अध्यक्ष आणि एमडी बनवण्यात आले. त्यांनी काही काळ ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणूनही काम केले आहे. ११ डिसेंबर २०२४ रोजी ५६ वर्षीय नागरी सेवक मल्होत्रा यांची पुढील तीन वर्षांसाठी आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. आरबीआयचे गव्हर्नर म्हणून सहा वर्षे पूर्ण करणाऱ्या शक्तीकांत दास यांच्या जागी ते काम पाहणार आहेत. गेल्या आठवड्यात, आरबीआय गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाल्यानंतरच्या त्यांच्या पहिल्याच पतधोरण समितीच्या बैठकीत, मल्होत्रा यांनी व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करून ६.५ टक्क्यांवरून ६.२५ टक्के केला. १२ व्या धोरणांनंतर आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात कपात करण्याची ही पहिलीच वेळ आहे.



