पुणे : राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) नवी मूल्यांकन पद्धती एप्रिल-मेमध्ये अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. डॉ. राधाकृष्ण समितीच्या शिफारशींनुसार दुहेरी (बायनरी) मूल्यांकन आणि मॅच्युरिटी आधारित श्रेणी स्तर मूल्यांकन सुरू करण्यासाठीची कार्यपद्धती व आराखडा तयार करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी नॅक मूल्यांकनासाठी आंध प्रदेशातील एका अभिमत विद्यापीठात गेलेल्या समितीचे लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात दहा जणांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नॅकने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, संबंधित प्रकरणातील विद्यापीठाची मूल्यांकन प्रक्रिया रद्द करून पुढील पाच वर्षांसाठी मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापासून प्रतिरोध करण्यात आले आहे. संबंधित समितीतील सर्व सात सदस्यांवर तत्काळ प्रभावाने मूल्यांकन किंवा नॅकच्या इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी तहहयात बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्या सात सदस्यांनी या पूर्वी वर्षभरात केलेल्या भेटींची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. त्याबाबत आवश्यक कार्यवाहीसाठी कार्यकारी समितीकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गुणवत्ता वाढीसाठी प्रोत्साहन
नव्या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये एक ते पाच स्तर तयार करून उच्च शिक्षण संस्थांना त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ही पद्धत डिसेंबर २०२४ पासून लागू करण्यात येणार होती. आता नॅकने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, डॉ. राधाकृष्णन समितीच्या शिफारशींनुसार, एप्रिल-मेमध्ये दुहेरी, मॅच्युरिटी आधारित मूल्यांकन प्रक्रिया, त्याचा आराखडा आणि कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केल्या आहेत, असे नमूद करण्यात आले आहे.



