पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) यांच्यातील वादामुळे रखडलेला शिवाजीनगर येथील जुन्या एसटी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही विभागांमध्ये समेट घडवून आणण्यात आला असून, या प्रकल्पासाठी ‘एमएसआरटीसी’ आणि महामेट्रो यांच्यात येत्या आठवडाभरात करार करण्यात येणार आहे. ६०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन मे महिन्यात होणार असून, तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
शिवाजीनगर येथील एसटी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बुधवारी आढावा बैठक पार पडली. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, दूरदृश्य प्रणालीद्वारे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर, नगरविकास विभागाचे सहसचिव विजय चौधरी उपस्थित होते.
शिवाजीनगर येथील जुन्या बसस्थानकाची जागा महामेट्रोने पुनर्बांधणीसाठी ताब्यात घेतली आहे. महामेट्रोकडून बसस्थानकाच्या सुविधांबाबत आराखडादेखील तयार करण्यात आला आहे. मात्र, प्रवाशांच्या सुविधा, अत्याधुनिक पद्धतीचे बसस्थानक, वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष आणि इतर सुविधा देण्याची मागणी महामंडळाकडून करण्यात आली. त्यावरून दोन्ही विभागांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते.
हा प्रकल्प महत्त्वाचा असून, विकसकाशी ९९ वर्षांचा करार करावा लागणार आहे. त्यासाठी संबंधित प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याचा आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला.



