पालघर : अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासह ऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी रविवारी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्पातील अधिकाऱ्यांकडून संबंधित तंत्रज्ञान आणि अन्य बाबींची माहिती घेतली.
गौतम अदानी यांच्यासह अदानी एनर्जी, अदानी ग्रीन व एनर्जी स्ट्रॅटेजी या कंपन्यांचे अधिकारी सकाळी साडे दहाच्या सुमारास हेलिकॉप्टरने तारापूरला दाखल झाले. भेटीदरम्यान देशाचा अणुऊर्जा कार्यक्रम, सद्यास्थिती व भविष्यासाठीचा दृष्टिकोन याबाबत न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआयएल) तारापूर व मुख्यालय येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली.
तसेच अदानी समूहाच्या शिष्टमंडळाने अणुऊर्जा प्रकल्प तीन व चारला प्रत्यक्ष भेटही दिली. अदानींसह त्यांच्या समुहाचे अधिकारी दुपारी ३ वाजेपर्यंत तारापूर प्रकल्पात होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या २०२५-२६च्या अर्थसंकल्पात अणुऊर्जा उत्पादनाला चालना देण्यासाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. तसेच खाजगी उद्याोगांमार्फत अणुऊर्जा उत्पादन करण्यासही आता मुभा देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अदानी यांच्या या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.



