पुणे : राज्यातील अन्य मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती राज्य सरकारने वकिलामार्फत दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय अपेक्षित असून, एप्रिल किंवा मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे रविवारी दिली.
भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व कार्यशाळेनंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ‘राज्यातील निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय देईल. तसे झाल्यास तातडीने निवडणूक घेण्याची आमची तयारी आहे. विधानसभेत महायुतीने २३७ जागा जिंकल्या होत्या. आताही सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांवर महायुतीच विजयी होईल,’ असा दावाही बावनकुळे यांनी केला.
ते म्हणाले, ‘महायुती सरकार योजना बंद करणारे नाही. प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्थशीर्ष तयार करून त्यासाठी पुरेशी तरतूद केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या व्याख्येनुसार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. जे पात्र नाहीत किंवा ज्यांना योजनेच्या लाभाची आवश्यकता नाही, त्यांनी योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंडेंबाबत भाष्य टाळले
‘बीडप्रकरणी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा किंवा नाही, हा मुंडे, अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी बोलणार नाही,’ असे सांगून बावनकुळे यांनी या प्रकारावर अधिक भाष्य करणे टाळले.


