न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहार झाल्याने असंख्य सामान्य ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू असून बांधकाम व्यावसायिक धर्मेश जयंतीलाल पौन (५८) आणि मुख्य आरोपी महाव्यवस्थापक हितेश मेहता या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणावरून संजय राऊत यांनी भाजपा आमदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. आज ते माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, मुंबईत न्यू इंडिया बँक ज्याप्रकारे लुटली गेली त्यात सर्व भाजपाचे लोक आहेत. या बँकेत जनतेचा पैसा आहे. पण येथे सर्व बिल्डर आहेत, नेता, जैन आणि भाजपाचे कदम आहेत. आता कुठे गेले मुलुंडचे पोपटलाल? शेकडो कोटींना बँक लुटली गेली. आता का बोलत नाहीत? भाजपाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय
काल पुन्हा एकदा अमृतसरला अमेरिकेच्या लष्कराचं विमान उतरलं. अफगाणिस्ताननंतर अमेरिकेचे लष्करी विमान उतरणारं भारत हा दुसरा देश आहे. शीख बांधवांच्या पगड्या उतरवल्या गेल्या. काय करतंय भाजपा? हा त्यांना अपमान वाटत नाही. शीखांच्या पगड्या उतरवून त्यांना बेड्या घालून त्यांना इथे आणलं. नरेंद्र मोदी युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवू शकतात. पण आमच्या भारतीयांच्या पायात बेड्या अमेरिकेने घातल्या. ५६ इंचाची छाती घेऊन मोदी अमेरिकेत गेले, त्या छातीत टाचणी टोचली आणि ते इथे आले. तिसरं विमान अमेरिकेतून आलं, मग मोदींनी काय केलं? हिंदू कुंभच्या नावाखाली तुडवला जातो. दिल्लीचं रेल्वे प्लॅटफॉर्म असेल, नाहीतर प्रयागराज असेल, सरकार आहे कुठे?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.



