मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलं आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर आला आहे. नैतिकतेच्या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी राजीनााम द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विरोधकांचे हे प्रश्न पत्रकारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी राजीनामाप्रकरणी मुंडेंनाच प्रश्न विचारा, असं म्हटलं आहे.

आर. आर. पाटील आणि विलासरावांनी राजीनामा दिला होता. मग ही नैतिकता धनंजय मुंडे का दाखवत नाहीत? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, “आपण त्यांनाच प्रश्न विचारा. तुमच्या आमच्या पक्षाचं असं काही नसतं. तेही काही गोष्टी बघत असतील ना. त्यांचं म्हणणं आहे की माझा दुरान्वयेही संबंध नाही.” असं म्हणत अजित पवारांनी राजीनामा चर्चावर हात झटकण्याचा प्रयत्न केला.

संजय राऊत काय म्हणाले?

“धनंजय मुंडेनी राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा कोणी घ्यायचा हे ठरवलं पाहिजे. अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीसांनी घ्यायचा, हे ठरलं पाहिजे”, असा पलटवार संजय राऊत यांनी केला.

धनंजय मुंडे यांनी काय स्पष्टीकरण दिलं होतं?

“मी नैतिक आहे आणि देशमुख हत्येप्रकरणात मी दोषी नाही आणि हे माझे मत मला माझ्या वरिष्ठांना सांगावे लागेल”, असं दोन आठवड्यांपूर्वी धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं होतं.

बुद्धीला पटले नाही म्हणून….

रेल्वे अपघात झाल्यावर नैतिकता म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अनेक रेल्वे अपघात झाल्यानंतरही कोणी राजीनामा दिला का, असा प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यावर बुद्धीला पटले नाही म्हणून राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना काल केला.