दिल्ली विधानसभा निवडणूक निकालास सुमारे दहा दिवसांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतरही नवीन मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स कायम आहे. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजप आमदारांची आज ( दि.१७) बैठक होणार होती. मात्र आता ही बैठक आता मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ही बेठक झाल्यानंतर १९ किंवा २० फेब्रुवारी रोजी शपथविधी होईल, अशी माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे.
भाजपने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित केलेला नाही. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक १९ फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आली आहे, ज्यामध्ये दिल्ली मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. विधिमंडळ पक्षाची बैठक १७ फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज होईल तर १८ फेब्रुवारी रोजी शपथविधी सोहळा होणार असल्याची चर्चा होती; परंतु काही काळानंतर ते दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री, भाजप आणि एनडीए शासित २० राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा समावेश असेल. याशिवाय उद्योगपती, चित्रपट तारे, क्रिकेट खेळाडूंचाही समावेश असेल. दिल्लीतील शपथविधी सोहळ्यासाठी १२ ते १६ हजार लोकांना बोलावण्याची तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या व्यवस्थेवर देखरेख करण्यासाठी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आणि तरुण चुघ यांना प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ६ नावे
भाजपने सर्व राजकीय अटकळ बाजूला ठेवून, संघटनेतील जुन्या चेहऱ्यांना राज्याची सूत्रे सोपवली आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ६ आमदारांची नावे आघाडीवर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने १५ आमदारांची नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी ९ नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. या ९ नावांमधून मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि सभापतींची नावे निश्चित केली जातील. दिल्ली मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ७ मंत्री असू शकतात. अशा परिस्थितीत दिल्लीतील सातही लोकसभा जागांमधून प्रत्येकी एक भाजप आमदार निवडून येऊ शकतो अशी चर्चा आहे. बिहार आणि पंजाबच्या निवडणुकांव्यतिरिक्त, जातीय समीकरणे लक्षात घेऊन त्यांची निवड केली जाईल.
२८ पैकी २१ राज्यांवर भाजपची सत्ता
दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर, भाजप किंवा एनडीए सरकार २८ पैकी २१ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा असलेल्या सत्तेवर आले आहे. यासह, भाजप २०१८ च्या स्थितीत परतला आहे. तेव्हाही भाजप किंवा एनडीएची देशातील २१ राज्यांमध्ये सत्ता होती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत ६० पेक्षा जास्त जागा जिंकणाऱ्या ‘आप’ला यावेळी २२ जागांवर घसरण झाली आहे. तर काँग्रेसला सलग तिसऱ्या निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर, भाजप किंवा एनडीएने ८ पैकी ५ राज्यांमध्ये निवडणुका जिंकल्या. यामध्ये आंध्र, अरुणाचल, ओडिशा, हरियाणा आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. तर जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये विरोधी पक्षांची सरकारे आहेत.त्याच वेळी, सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) चे सरकार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि एसकेएममधील युती तुटली, जरी दोघेही केंद्रात एकत्र आहेत.