
शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांच्या सोशल मीडियावरील स्टेटसवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. “म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसंच काय जनावरं सुद्धा विश्वास ठेवतात, या त्यांच्या पोस्टचा अर्थ लावत शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी भास्कर जाधव यांना थेट शिवसेनेत (शिंदे गट) येण्याची खुली ऑफर दिली आहे.
- संजय शिरसाट यांचा दावा
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, भास्कर जाधव यांच्या स्टेटसचा अर्थ समजून घ्या. त्यांचा म्होरक्या धाडसी नाही, असे त्यांना वाटत आहे. एकदा निर्णय घेतल्यावर भास्कर जाधव मागे हटत नाहीत. त्यामुळे येत्या महिनाभरात मोठे राजकीय बदल होणार आहेत. त्यांनी हे देखील भाकीत केले की, स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यावर आरोप झाल्यास तो सहन करू शकत नाही. त्यामुळे जाधव तिथे (ठाकरे गटात) राहणार नाहीत.
- ‘आदित्य ठाकरे नेते कधी झाले?’
संजय शिरसाट यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. खासदारांनी स्नेहभोजनासाठी परवानगी घ्यावी, असे वक्तव्य आदित्य ठाकरे करत असतील, तर तो लाचारीचा कळस आहे. मातोश्रीची प्रतिष्ठा घालवली आहे, हे कबूल करण्याचे धाडस त्यांना दाखवावे लागेल.
- ‘ऑपरेशन टायगर’मधून मोठ्या प्रवेशांची तयारी – शिरसाट
शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटातील नेते आपल्या बाजूला ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिरसाट यांनी सांगितले की, “मी स्वतः किनवटला गेलो होतो, नावांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच मोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) हा संघर्ष आणखी तीव्र होत असून, आगामी काही दिवसांत महत्त्वाचे राजकीय बदल होण्याची शक्यता आहे.


