![]()
शिर्डी (अहिल्यानगर) – युनायटेड किंग्डम येथून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्त परिवाराची शिर्डीत फसवणूक (Shirdi crime news) करण्यात आल्याची घटना समोर आलीय. पूजा साहित्याच्या नावाखाली तब्बल चार हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्यानं शिर्डी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.
मूळ पंजाब येथील आणि व्यवसाय निमित्तानं युनायटेड किंग्डम येथे स्थायिक असलेले साईभक्त कुटुंबीय आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जात असताना त्यांना कमिशन एजंट उर्फ पॉलीशी एजंटनं हार-फूल प्रसाद दुकानावर बळजबरीनं नेलं. दुकानावर 500 रुपये किमतीचे पुजाचे साहित्य 4 हजार रुपयांना दिले. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला.
दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात- सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांनी स्वतः भाविकांना घेवून शिर्डी पोलीस ठाण्यात नेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. भाविकाची फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यात फूल भांडार दुकान जागा मालक, चालक आणि कमिशन एजंट या सर्वांना आरोपी करण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
दर पत्रक लावण्यासाठी बंधनकारक केले जाणार- शिर्डीत साईभक्तांना लुटण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. यापुढे आता मूळ जागा मालकालादेखील आरोपी केले जाणार आहे. अगदी लहान दुकान तीन ते चार हजार रुपये रोजानं भाड्याने दिली जातात. यामुळे भाविकांना लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शिर्डीतील फूल भांडार दुकानांवर पूजा साहित्याचे दर पत्रक लावण्यासाठी बंधनकारक केलं जाणार असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी दिली आहे.
साईभक्तांची लूट थांबविण्याची ग्रामस्थांची मागणी- शिर्डीत गेल्या काही दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. या प्रकरणी शिर्डी ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहेत. युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांनीदेखील प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी ग्रामसभेचे आयोजन करत विविध प्रस्ताव मांडले होते. फूल प्रसाद विक्री दुकानांतून साईभक्तांची लूट करणाऱ्या बाहेरील प्रवृत्तींचा पोलीस प्रशासनाकडून बिमोड व्हावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. लूट होईल त्या दुकानाच्या मालकावर थेट गुन्हा दाखल व्हावा, असा अनेकांनी प्रस्ताव मांडला होता. यानंतर साईभक्तांची लूट थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. या प्रस्तावाला काही दिवस उलटत नाही तोच शिर्डीतील फूल भांडारात साईभक्ताची फसवणूक झाल्याची घटना घडल्यानं शिर्डीत खळबळ उडाली आहे.


