
भाजपच्या माजी नगरसेवकानं पोलीस ठाण्यातच विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी या माजी नगरसेवकानं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा संशियत मास्टरमाईंट वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी विष घेतल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या भरत जाधव यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जाधव यांना व्यवसायामध्ये आणि राजकीय जीवनात काम करताना अडचणी निर्माण करत त्रास देण्यात येत होता. याची माहिती त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिली आहे.
मी आज प्रचंड मानसिक तणावात….
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, भरत जाधव यांनी व्हिडीओमध्ये मी आज प्रचंड मानसिक तणावात हे पाऊल उचलत आहे. कारण समाजामध्ये वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती इतकी वाढत चालली आहे की, तुम्ही प्रामाणिकपणे कामच करु शकत नाही. असं म्हटलं आहे.
तसेच, 25 वर्षांच्या राजकारणात इतर राजकारण्यांप्रमाणे मी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले, असे कोणीही सांगून दाखवावे. चार-पाच वर्षांपूर्वी कर्जत-जामखेड तालुक्यात बिल्डींगचं काम सुरु केलं. रमेश आसबे, युनुस सय्यद, बेबीचंद धनावडे आणि मी. रमेश आसबेचं आणि सचिन घायवळ व निलेश घायवळचा काय वाद झाला मला माहिती नाही. मात्र, अडीच-तीन वर्षे त्यांनी दहशतीच्या जोरावर बिल्डींगचं काम बंद पाडले आहे. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोन-तीन गाड्या साईटवर येतात, 30-40 पोरं उतरतात. त्यामुळे या बिल्डींगचं एकही बुकिंग होत नाही. आज जवळपास तीन-चार कोटी टाकून, बँकेचे कर्ज घेऊन मी नुकसान सहन करत आहेत. सहन होत नाही, असा घडलेला प्रकार सांगत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
रत जाधव यांनी 2021 मध्येही मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा
भरत जाधव यांनी 2021 मध्येही मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. आता मी कंटाळलो, फार सहन होत नाही. माझ्यावर सतत अन्याय होत आहे. खोटे गुन्हे दाखल करून माझा छळ केला जात आहे. गेली ८ महिने मी न्यायासाठी धावाधाव करत आहे, पण कुठूनही मला न्याय मिळत नाही, असे सांगत त्यांनी त्यावेळी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

