मुंबई : गिरगाव येथे काही महिन्यापूर्वी एका कंपनीत मराठी माणसाला नोकरी देण्यात येणार नाही, अशी जाहिरात देण्यात आली होती. तर डोंबिवलीमध्येही एका सोसायटीत मराठी हिंदी भाषेवरुन वाद झाला होता आणि मराठी माणसाला हाणामारी करण्यात आली. या दोन घटना ताज्या असताना आता पुन्हा एकदा मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे एका शोरूममध्ये मराठी बोलण्यावरुन वाद झाल्याची घटना घडली. यावरुन ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून, याचा जाब विचारत शोरूममधल्या मॅनेजरला माफी मागायला लावली.
नेमकं काय घडला प्रकार? : शुक्रवारी गिरगावमधील एक मराठी कुटुंब क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी गेले असता, ते मराठीत बोलले. परंतु तेथील मॅनेजरने तुम्ही मराठीत बोलू नका हिंदी किंवा गुजराती भाषेत बोला असं म्हटलं. यावरुन तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांनीही मराठी कुटुंबाची खिल्ली उडवली. घडलेला सर्व प्रकार मराठी कुटुंबाने शिवसेनेचे गिरगावतील विभागप्रमुख संतोष शिंदे यांना सांगितला. हा प्रकार अतिशय संतापजनक असल्याचं पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी याचा जाब विचारण्यासाठी ते शोरुममध्ये गेले. त्यानी शोरूमच्या मॅनेजरला मराठीत माफी मागायला भाग पाडलं.


