छत्रपती संभाजीनगर : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या लिपिक, टंकलेखक, कर सहायकांच्या अनुक्रमे सात हजार ३४ व ४३८ पदांच्या परीक्षेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याच्या तक्रारींचे सर्व अर्ज महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे (मॅट) न्यायिक सदस्य न्या. व्ही. के. जाधव व प्रशासकीय सदस्य विनय कारगावकर यांनी फेटाळले आहेत. त्यामुळे साडेसात हजार उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. याप्रकरणी साडेतीनशेपेक्षा अधिक तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते.
एमपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत कौशल्य चाचणीत तांत्रिक अडथळा आल्याच्या तक्रारी करून परीक्षा नव्याने घेण्याची मागणी करण्यात आली होती. आयोगाने अर्जदारांचे म्हणणे नाकारले. लेखी परीक्षेनंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. लिपिक, टंकलेखक पदासाठी केवळ लेखी परीक्षेचा विचार केला जाणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते. नवीन टंकपटल (की बोर्ड) व इतर बाबी बसविल्याचा मॅटमध्ये अर्जदारांनी दावा केला. संबंधित दावा मॅटने ग्राह्य धरला नाही. सर्व अर्ज फेटाळले. अर्जदारांच्या वतीने अॅड. अमोल चाळक, अॅड. प्रतीक भोसले, पी. एम. कांबळे यांनी बाजू मांडली. एमपीएससीकडून अॅड. बालाजी येणगे यांनी युक्तिवाद केला.



