
नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे संकेतस्थळ काही दिवसांपासून अचानक बंद पडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरताना अडचणी निर्माण झाल्या आहे. ही समस्या लक्षात घेऊन शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शिक्षणसंस्था व विद्यार्थ्यांमधून होत आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळाची ही दरवर्षीची अडचण आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी संकेतस्थळ सुरू केले जाते. परंतु, अनेकदा संकेतस्थळावर अर्ज करताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात. करोनानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा होतात. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती अर्जासाठीही विलंब होतो. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. परंतु, त्यानंतरही अनेक विद्यार्थी अर्ज करू शकलेले नाही. सध्या मागील काही दिवसांपासून संकेतस्थळ पूर्णपणे बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्जाचे संकेतस्थळ तत्काळ सुरू करावे व अर्जास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिक्षणसंस्था व विद्यार्थ्यांमधून होत आहे.
वेळेत अर्ज करणे आवश्यक
विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून ६० टक्के तर राज्य सरकारकडून ४० टक्के शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती कधीच वेळेत मिळत नाही अशी ओरड असते. परंतु, विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावरही वेळेत अर्ज केले जात नसल्याने शिष्यवृत्ती मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांचे कागदपत्र मिळण्यास अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.



