
गेल्या महिनाभरात डेटिंग अॅपच्या (उपयोजन) माध्यमातून लूटमारीच्या पाच ते सहा घटना घडल्या. व्यावसायिक, संगणक अभियंता तरुण चोरट्यांच्या जाळ्यात सापडले. चोरट्यांनी त्यांना निर्जन ठिकाणी बोलावून लुटले. या प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांना अटकही केली. समाज माध्यमात अनोळखी व्यक्तीबरोबर झालेली मैत्री अंगलट येऊ शकते, याची जाणीव अनेकांना नाही. त्यामुळेच की काय ‘डेटिंग अॅप’चे जाळे दिवसेंदिवस घट्ट होत चालले असून, या मोहजालात सापडून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे.
आपल्या एकटेपणावर मात करण्यासाठी अनेक जण डेटिंग अॅपच्या माध्यमातून नवीन मित्र-मैत्रिणी शोधतात. या अॅपच्या माध्यमातून विवाहास अनुरूप जोडीदाराचीही निवड केली जाते. मात्र, अशा प्रकारच्या अॅपमधून मैत्रीच्या नावाखाली गैरप्रकार सुरू झाल्याचे उघडकीस आले आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू यांसह देशातील प्रमुख शहरांत मैत्रीचे आमिष दाखवून लूटमार करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहे. देहविक्रयाचे प्रकारही या अॅपच्या माध्यमातून चालतात.
पाश्चात्त्य देशातील डेटिंग अॅपची संकल्पना भारतात दहा वर्षांपूर्वी रुजली. नवे मित्र-मैत्रिणी जोडणे, हा त्या मागचा त्या वेळी मुख्य उद्देश होता. मात्र, चोरट्यांनी या अॅपच्या माध्यमातून लूटमारीचे प्रकार सुरू केले. समाज माध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर करून जाळ्यात ओढण्यात आले. खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू झाले. खंडणी न दिल्यास समाज माध्यमात चित्रफीत किंवा छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली. बदनामीच्या भीतीपोटी अनेकांनी घाबरून चोरट्यांना पैसे दिले. दोन वर्षांपूर्वी सहकारनगर भागातील एका तरुणाला धमकावून त्याच्याकडे पैसे मागण्यात आले. पैसे न दिल्यास चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली. धमकीमुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मॉडेल कॉलनी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची डेटिंग अॅपच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. गेल्या महिनाभरात अॅपच्या माध्यमातून पुणे शहरात लूटमारीच्या चार ते पाच घटना घडल्या. सिंहगड रस्ता भागातील एका व्यावसायिकाला जाळ्यात ओढून चोरट्यांनी त्याला धायरीतील एका निर्जन भागात बोलावून लुटले. हडपसरमधील मगरपट्टा भागातील एका संगणक अभियंता तरुणाला अशाच पद्धतीने लुटण्यात आले. अशा प्रकारच्या घटना ग्रामीण भागात वाढीस लागल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने नगर रस्ता भागातील शिक्रापूर परिसरात लूटमार करणाऱ्या टोळीला नुकतीच अटक केली होती. धायरी, मगरपट्टा भागातील लूटमार करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात आले. तेव्हा चोरट्यांनी बनावट नाव, छायाचित्रांचा वापर करून तक्रारदारांना जाळ्यात ओढल्याचे उघडकीस आले होते.
समाज माध्यमातील मैत्रीच्या जाळ्यात सापडून शहरातील एका प्रसिद्ध संशोधन संस्थेतील संशोधक तरुणाचा पाषाण-सूस रस्ता परिसरातील टेकडीवर खून झाल्याची घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. सायबर चोरट्यांनी मैत्रीचे आमिष दाखवून अनेकांना जाळ्यात ओढून फसवणूक केल्याचे प्रकार मध्यंतरी घडले होते. अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडणाऱ्यांमध्ये महिलांचा समावेश होता. चोरट्यांनी महिलांना लक्ष्य केले होते. परदेशातील बड्या कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी सायबर चोरट्यांकडून केली जायची. समाज माध्यमात बनावट खाते, छायाचित्राचा वापर करून चोरटे महिलांना जाळ्यात ओढायचे. त्यानंतर परदेशातून महागडी भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखविले जायचे. विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (कस्टम) कारवाई करून भेटवस्तू जप्त केल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगून महिलांकडून लाखो रुपये उकळले जायचे. मोठ्या रकमा उकळल्यानंतर चोरटे त्यांचे मोबाइल बंद करायचे. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तक्रार देण्याशिवाय दुसरा पर्याय उरायचा नाही. अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे समाज माध्यमातील मैत्रीच्या आमिषापासून चार हात दूर राहणे कधीही चांगले.



