
पुणे : राज्यातील कुस्तिगीरांपुढे कोणत्या स्पर्धेत खेळायचे हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गडद होऊ लागला आहे. कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची राज्य अजिंक्यपद ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा पार पडल्यावर आता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनेदेखील राज्य अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे.
कुस्तीगीर संघाची स्पर्धा नगरमध्ये पार पडली. कुस्तीगीर परिषदेने नगरमध्येत कर्जत-जामखेड येथे रोहित पवार मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ज्येष्ठ संघटक बाळासाहेब लांडगे यांनी ही माहिती दिली.
न्यायालयाने आमच्या संघटनेला मान्यता दिली असून, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची मान्यता देखील आम्हालाच असल्याचे सांगत लांडगे यांनी आमचीच स्पर्धा खरी असल्याचा दावा केला आहे. कुस्तीगीर संघाच्या स्पर्धेत ४५ जिल्हा संघ सहभागी झाले होते. नव्याने २६ ते ३० मार्चदरम्यान होणाऱ्या स्पर्धेतही ४५ जिल्हा संघ सहभागी होणार आहेत.
दोन्ही संघटनेच्या स्पर्धेत सर्व जिल्हे उपस्थित राहत असतील, तर नेमकी मान्यताप्राप्त स्पर्धा कोणती हा प्रश्न मल्लांसमोर उभा आहे. या स्पर्धेत संघाच्या स्पर्धेत झाला तसा अन्याय कुठल्याही मल्लावर होणार नाही, असा विश्वास या वेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या विरोधात आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली असून, या प्रलंबित प्रकरणाचा निकाल लवकरच अपेक्षित आहे.
– बाळासाहेब लांडगे, राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस



