
नागपूर : राज्यात आणि विशेषत: विदर्भात होत असलेल्या वाघाच्या अवैध शिकारीच्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली. शिकारीच्या प्रकरणाची राज्य शासनाच्या वनविभागाकडून होत असल्याचा चौकशीचा प्रगती अहवाल तीन आठवड्यात न्यायालयात सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. याप्रकरणात शेजारील मध्यप्रदेश राज्यातील गुन्हेगार सामील असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचे संकेतही न्यायालयाने सुनावणीदरम्यान दिले.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघांच्या झालेल्या अडवणुकीच्या प्रकरणानंतर उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याचिकेवर न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयीन मित्र अॅड. सुधीर वोडितेल यांनी वाघांच्या अवैध शिकारीबाबत न्यायालयाचे लक्ष वेधले. मागील पाच वर्षांत राज्यात १६० वाघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतांश मृत्यू विदर्भ भागातील आहेत. वाघांच्या मृत्यू मागे अनेक कारण सांगितले जात असले तरी यामागे परराज्यातील शिकारी टोळी असल्याची माहिती अॅड. वोडितेल यांनी दिली. मध्यप्रदेशातील शिकारी वाघांची शिकार करून मेघालय राज्याच्या सीमेतून म्यानमार देशात वाघाच्या अवयवांची तस्करी करतात. याप्रकरणी राज्य वन विभागाकडून चौकशी केली जात आहे, मात्र यात प्रगती होत नसल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
वाघांच्या शिकारी प्रकरणाचे तार परराज्याशी जुळलेले आहे. याप्रकरणाची महाराष्ट्र राज्याकडून चौकशी केली जात आहे. त्यात परराज्यातील पोलीस, महसूल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही तर उच्च न्यायालयाला हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे वर्गीकृत करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. वाघांची शिकार थांबवण्यासाठी राज्य शासन स्थानिक नागरिकांची कशाप्रकारे मदत घेऊ शकते, याबाबत धोरण तयार करण्याच्या सूचनाही न्यायालयाने केल्या. वरील सर्व बाबींची माहिती अतिरिक्त प्रधान मुख्य वनसचिवांच्या निदर्शनास आणून देण्याचेही न्यायालयाने सांगितले.
मृत्यूसंख्या वाढल्याचे माहिती अधिकारातून उघड
यंदाच्या वर्षात जानेवारीमध्ये विविध कारणांनी ११ वाघ आणि २१ बिबट्यांचा मृत्यू झाला. मागील वर्षातील महिनेनिहाय सरासरी पकडल्यास राज्यात वाघ आणि बिबटच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. राज्यात २०२० मध्ये १८ वाघ व १९८ बिबटचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये ३२ वाघ व १६७ बिबट, २०२२ मध्ये २९ वाघ व १४० बिबट, २०२३ मध्ये ५२ वाघ व १३८ बिबटांचा मृत्यू झाला. तर २०२४ मध्ये २६ वाघ व १४४ बिबटचा मृत्यू झाला. २०२४ वर्षातील एकूण मृत्यूंच्या आकडेवारीवरून महिन्याचा अंदाज काढल्यास राज्यात महिन्याला २ वाघ तर १२ बिबटचा मृत्यू नोंदवला गेला. परंत, जानेवारी २०२५ या एकाच महिन्यात ११ वाघ व २१ बिबटचा मृत्यू झाल्याने या प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण मागच्या वर्षाहून वाढल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे. .



