अहमदाबाद : भगवान श्रीकृष्णाची कर्मभूमी असलेल्या द्वारकानगरीचा शोध घेण्याची मोहीम पुरातत्त्व खात्याच्या वतीने (एएसआय) घेण्यात आली आहे. 4 हजार वर्षांपूर्वी द्वारकेत श्रीकृष्णाचे साम्राज्य होते. श्रीकृष्णाच्या कर्मभूमीचा शोध घेण्यासाठी पुरातत्त्व खात्याच्या कर्मचार्यांनी समुद्रात डाईव्ह सुरू केले आहे.
गुजरातमध्ये समुद्राच्या किनार्यावरच द्वारकाधीशांचे मंदिर आहे. एएसआय पथकाने समुद्रात खोलवर डाईव्ह करीत द्वारकानगरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. द्वारकानगरी ही भगवान श्रीकृष्णाची कर्मभूमी मानली जाते. श्रीकृष्णाच्या साम्राज्याची अनुभूती घेण्यासाठी समुद्रात गूढ उकलण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती एएसआयच्या सूत्रांनी दिली. समुद्राखालील सांस्कृतिक वारशाचा अभ्यास आणि संरक्षण करण्यासाठी या मोहिमेचा उपयोग होणार आहे. हिंदू आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णाची द्वारकानगरी समुद्राखाली विसावली आहे. त्यामुळे द्वारकानगरीबाबत असणारी उत्सुकता आणि गूढ उकलण्यासाठी पुरातत्त्व खात्याने ही मोहीम सुरू केली आहे. 1930 पासून द्वारकानगरीची उकल करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या उत्खननामध्ये खांब, दगड, भांडी आढळून आल्या आहेत. त्यामुळे द्वारकानगरीबाबत उत्सुकता वाढत आहे.
याआधी 2005 आणि 2007 मध्ये पुरातत्त्व खात्याने गुजरात किनारपट्टीनजीक समुद्रात उत्खनन केले होते. त्यावेळी समुद्रात खोलवर द्वारकानगरीबाबतचे काही गूढ अवशेष आढळून आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच नव्याने मोहीम हाती घेण्यात आली आहे. 1930 पासून द्वारकेच्या उत्खननासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वातंत्र्यानंतर 1963 मध्ये प्रथमच द्वारकेचा शोध घेण्यासाठी पुरातत्त्व विभागाने समुद्रात उत्खनन केले होते. त्यानंतर 1980 मध्येही त्याद़ृष्टीने प्रयत्न करण्यात आले होते.