पुणे : जालना आणि यवतमाळ येथे दहावीच्या परीक्षेत मराठी विषयाचा पेपर फुटला नसल्याचा स्पष्ट निर्वाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दिला. परीक्षा सुरू झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि उत्तरे समाजमाध्यमात पसरविण्यात आल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. तसेच, या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
यवतमाळ आणि जालना जिल्ह्यात झालेल्या पेपरफुटीच्या आरोपांबाबत राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले. ‘जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे पेपरफुटीसंदर्भात भेट देऊन मराठी (प्रथम भाषा) विषयाच्या मूळ प्रश्नपत्रिकेची छाननी केल्यावर, समाजमाध्यमात फिरणारी दोन पाने मूळ प्रश्नपत्रिकेची नसून, अन्य खासगी प्रकाशकाने प्रकाशित केलेली असल्याचे दिसून आले.
हस्तलिखित मजकूर असलेल्या काही पानांमध्ये प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे असल्याचे आढळले. त्यामुळे, प्रश्नपत्रिका फुटलेली नसून, गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि उत्तरे ‘व्हायरल
केल्याचे दिसून येते. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव कोठारी या परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिका ‘व्हायरल’ केल्याचे दिसून येते,’ असे नमूद करण्यात आले आहे.
‘जालना जिल्ह्यातील तळणी येथील जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. पोलिसांच्या मदतीने पालकांना केंद्राबाहेर बाहेर काढण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही,’ असेही राज्य मंडळाचे नमूद केले आहे.



