
पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांच्या पथकाने शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून मध्यरात्री ताब्यात घेतले. त्याला शिवाजीनगर येथील न्यायालयात आणण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा, याबाबत पोलिसांकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीचा गाडे गुनाट गावातील उसाच्या शेतात लपून बसला होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे (थर्मल इमेजिंग), तसेच श्वानपथकाची मदत घेतली होती. गाडेला पकडण्यात गुनाट ग्रामस्थांनी मोठी मदत केली.
स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. एसटी स्थानकातील २३ कॅमेरे, तसेच स्थानकाबाहेरील ४३ कॅमेऱ्यांनी संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. गुनाट, ता. शिरुर, जि. पुणे) याचे नाव निष्पन्न केले. फिर्याद दाखल होण्याचे काम सुरू असतानाच दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांचे पथक गुनाट गावात पोहोचले. पोलीस आल्याची कुणकुण लागताच गाडे पसार झाला. पोलिसांनी गुनाट ग्रामस्थ, सरपंच, पोलीस पाटलांशी चर्चा केली. त्यानंतर ग्रामस्थही शोध मोहिमेत सहभागी झाले.
पाणी पिण्यासाठी घरात
गेले तीन दिवस पोलिसांचे पथक गुनाट गावात शोध घेत होते. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांनी गाडे उसाच्या फडातून बाहेर पडला. गावातील एकाच्या घरात पाणी पिऊन तो पुन्हा पसार होण्याच्या तयारीत होता. एका ग्रामस्थाने त्याला पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले.
एक लाखाचे बक्षीस
गाडेला पकडण्यात गुनाट ग्रामस्थांची मोठी मदत झाली. जवळपास ४०० ते ५०० पोलीस कर्मचारी, गुनाट गावातील प्रत्येक जण गाडेचा शोध घेत होते. गावातील पायवाटांची माहिती ग्रामस्थांना होती. पोलिसांना बरोबर घेऊन ग्रामस्थांनी तेथे गस्त घातली. उसाच्या फडात शिरणे सोपे नसते. ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस फडात शिरले. ज्या ग्रामस्थाच्या सतर्कतेमुळे तो पकडला गेला, त्याला पोलिसांकडून एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे हा आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. त्याला ताब्यात घेण्यात आले, तेव्हा त्याच्याकडे कीटकनाशकाची बाटली सापडल्याबाबत प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. तेव्हा पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘गाडे आत्महत्या करण्याचा प्रयत्नात होता याबाबत आताच ठोस सांगणे चुकीचे आहे. तपास सुरू आहे. गाडेला ताब्यात घेण्यात आले, तेव्हा त्याच्या गळ्यावर खरचटल्याच्या वा दोरीने आवळल्याच्या खुणा आढळून आल्या.
आरोपी दत्तात्रय गाडेला कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, तसेच खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा, याबाबत शासनाकडे विनंती करण्यात येणार आहे.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त


