मुंबई : अबू आझमींनी औरंगाजेबाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. यावर बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “अबू आझमींनी चुकीचं विधान केलं आहे. याबाबत आम्ही त्यांचा निषेध करतो. औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांचा ४० दिवस छळ केला. अशा क्रुर व्यक्तीला चांगलं म्हणणं महापाप आहे. याबाबत अबू आझमींनी माफी मागवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला पाहिजे.”
औरंगजेब चांगला प्रशासक कसा? : ज्या औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस छळ करून मारलं. त्यांचा अपमान केला, अत्याचार केला. अशा औरंगजेबाला चांगलं म्हणणं हे महापाप आहे. त्यानं हिंदूंची मंदिरं तोडली. त्यानं गरिबांना लुटलं. आया-बहिणींवर अत्याचार केले. त्यानं अनेकांना धर्मपरिवर्तन करायला लावलं. औरंगजेब महापापी होता. अशी व्यक्ती चांगला प्रशासक कशी होऊ शकते? असा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
कोरटकरनंतर अबू आझमींचं आक्षेपार्ह वक्तव्य : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरमुळं राज्यातील वातावरण आधीच तापलं आहे. अशातच आता सपाचे आमदार अबू आझमी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय.
काय म्हणाले होते अबू आझमी? : “औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळात भारताची जीडीपी सर्वात जास्त होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्माची लढाई नव्हती, देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं रंगवली जात आहे.” अशी प्रतिक्रिया सपाचे आमदार अबू आझमी यांनी दिली होती. यामुळं त्यांच्या वक्तव्यावरुन नवा वाद सुरू झालाय.



