मुंबई- फेब्रुवारी महिना संपूनही लाडकी बहीण योजनेचा महिला लाभार्थ्यांना हप्ता मिळालेला नाही. अशा स्थितीत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हप्ता कधी दिला जाणार आहे, याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त ८ मार्चला महिला लाभार्थ्यांना २ महिन्यांचा हप्ता दिला जाणार आहे, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. त्यामुळे महिला लाभार्थ्यांना त्या दिवशी फेब्रुवारी आणि मार्च असे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळणार आहेत.
- विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा हप्ता १५०० वरून २१०० रुपये करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. प्रत्यक्षात, या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याला दरवर्षी ४६,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येईल, असा अंदाज आहे. जर हप्त्याची रक्कम वाढली तर राज्याच्या तिजोरीवर आणखी भार वाढण्याची शक्यता आहे.
- आगामी महापालिका निवडणुकांनंतर भाजपा ‘लाडकी बहीण योजना’ बंद करणार असल्याचा दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतेच मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केला होता.
विरोधकांना योजनेतील सकारात्मकता पाहवत नाही : या योजनेसाठी फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक कारणामुळे हा हप्ता वितरीत होण्यास उशीर झाला. परंतू आता फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्यातील हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात 8 मार्चला जमा होईल. फेब्रुवारी आणि मार्च असे दोन महिन्यांचे हप्ते येतील, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. ही योजना केवळ निवडणुकीपुरती होती, असा अपप्रचार विरोधक करतायेत, त्यांना या योजनेतील सकारात्मकता पाहवत नाही, अशी टीका अदिती तटकरेंनी विरोधकांवर केली.



