धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे क्रौर्याची परिसीमा दाखवून देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुंडेंनी ट्विट करत राजीनाम्याच दुसरंच कारण सांगितलं आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहे.
मुंडे यांनी नैतिकतेला धरुन राजीनामा दिल्याची चर्चा सुरु आहे पण मुंडेंनी स्वतः ट्विट करत राजीनाम्याचं कारण वैद्यकीय असल्याचे सांगितलं आहे. त्यांचे हे ट्विट पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजीनाम्याच्या कारणांमध्ये विसंगती पाहयला मिळत असल्याने राजीनामा नेमका कशासाठी घेण्यात आला हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं अशी मागणी राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे.
काय आहे ट्विट?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.
दोन सहकाऱ्यांकडून धनंजय मुंडे यांनी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोपवला. धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला.
राजीनाम्याच्या गदारोळात मुंडेंना बेल्स पाल्सी आजार
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंडे यांनी ट्विट करत त्यांना बेल्स पाल्सी आजार झाल्याची माहिती दिली होती. “मला बेल्स पाल्सी या नावाच्या आजाराचं निदान झालं आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही,” अशा आशयाचे ट्विट मुंडेंनी केलं होते. त्याचदरम्यान, त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशनदेखील झाले होते.
काल बैठक अन् थेट आदेश, नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची एक बैठक पार पडली. जवळपास दोन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना ‘उद्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या’, असा आदेश दिला.
देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. मात्र, अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास उशीर झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.
नेमकं काय प्रकरण?
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली होती. धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि त्यांचा राईट हँड अशी ख्याती असलेला वाल्मिक कराड या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याचे आरोप झाले होते. सुरुवातीला बीड पोलिसांनी याप्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यापासून ते तपासात प्रचंड विलंब केला होता.
अखेर राज्यात याप्रकरणावरुन प्रचंड रोष निर्माण झाला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाची गंभीर दखल घेत तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीआयडी आणि एसआयटीने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला होता. यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे सीआयडीने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. नुकतेच याप्रकरणात 1500 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले होते.



