पुणे : विनोदवीर कुणाल कामराला तातडीने अटक करावी, आमच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा शिवसेना नेते व पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला. कामरा जेथे कोठे असेल तेथून ताब्यात घ्या, त्याला टायरमध्ये घालून ‘प्रसाद’ द्या, असा सल्लाच देसाई यांनी पोलिसांना दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्याने आम्ही शांत राहिलो. कामरा जेथे लपला असेल तेथून कसे उचलून आणायचे हे आम्हाला शिवसैनिक म्हणून माहीत आहे. पण मंत्री असल्याने काही मर्यादा असल्याचे वक्तव्यही देसाई यांनी केले. कुणाल कामराने कार्यक्रमात ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील गाण्याचा आधार घेत विडंबन सादर केले होते. यामध्ये गद्दार शब्दप्रयोग केला होता. एकनाथ शिंदे यांना उद्देशून असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी रविवारी रात्री खार परिसरात स्टुडिओची मोडतोड केली होती. एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले होते.
कामराविरोधात ‘हक्कभंग’ दाखल
मुंबई: विनोदवीर कुणाल कामराविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करून घेण्यात आला आहे. कामरावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एका कार्यक्रमात अवमान केल्याचा आरोप आहे. यात उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचाही उल्लेख आहे. कामराने गद्दार शब्दप्रयोग केल्याने हक्कभंगाची नोटीस देण्यात आली. ती हक्कभंग समितीकडे पाठविण्यात आल्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.