
मुंबई : एखाद्याने जांभई दिल्यास त्या व्यक्तीला झोप आली किंवा थकवा आला असे समजले जाते. परंतु काही जणांना दिवसभरात सतत जांभया येत असतात. म्हणून सतत झोप येते, असा त्याचा अर्थ नसतो. तर या वारंवार येणाऱ्या जांभया मेंदूपासून हृदय आणि पोटापर्यंत जाणाऱ्या व्हॅगस मज्जातंतूशी जोडल्या जातात. हे मोठ्या आजारांचे लक्षण असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
जांभई मेंदूला शरीर जागृत ठेवण्याच्या दृष्टीने मदत करते. परंतु रात्रंदिवस, वारंवार जांभया येत असतील तर ते विविध आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते. ही समस्या व्यक्तीपरत्वे बदलूही शकते, असे मुंबईतील एका आरोग्य सल्लागाराने सांगितले. वारंवार जांभई येत असेल आणि थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे यांसारख्या इतर लक्षणांसह जांभई असेल, तर आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
वाढत्या जांभया म्हणजे अपस्माराचे संकेतही असूू शकतात. तसेच काही लोकांमध्ये ते ‘ब्रेन ट्यूमर’चे संकेत असतात. चांगली झोप न मिळाल्याने, मानसिक थकव्यामुळे वारंवार जांभया येतात. रक्तातील ऑक्सिजन वाहतुकीसाठी लोह आवश्यक आहे. लोहाची पातळी कमी असल्यास ऑक्सिजन पुरवठ्यात व्यत्यय येतो. त्यामुळे जांभईचे प्रमाण वाढू शकते. यासाठी शारीरिक हालचाल आणि नियमित व्यायामामुळे ऑक्सिजनची पातळी आणि एकूणच आरोग्य सुधारता येते.
जांभईपासून होणारे हृदयरोग, ब्रेनट्यूमर, पोटाचे विकार टाळण्यासाठी नियमित झोप घ्या, आहारात पालक भाजी आणि सफरचंद, बेरीसारख्या फळांचा समावेश करून लोहाचे सेवन वाढवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.



