लातूर: लातूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. परंतु, ते सुदैवाने यामधून बचावले. त्यांच्यावर सध्या लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लातूर शहर रात्री उशिरा झालेल्या घटनेमुळे हादरुन गेले आहे.
बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या घरात त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गोळीचा आवाज झाल्याने घरातील इतर सदस्यांनी त्यांच्या रुमकडे धाव घेतली. तात्काळ त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बाबासाहेब मनोहरे यांनी पिस्तुलमधून गोळी झाडल्यानंतर डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी आरपार गेली. त्यामुळे लगेच रक्तस्राव सुरु झाला.
बाबासाहेब मनोहरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचाराला ते प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिली आहे.



