
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र अर्जाची पडताळणी केली जाईल असे सरकारकडून जानेवारीत जाहीर करण्यात आले. पडताळणीनंतर लाडक्या बहीणींच्या संख्या कमी होण्याऐवजी फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चच्या अनुदानात वाढली आहे. जानेवारी महिन्यात पाच लाख लाडक्या बहीणींना अपात्र ठरवून दोन कोटी ४१ लाख लाडक्या बहिणींना अनुदान देण्यात आले. त्याच वेळी फेब्रुवारी व मार्च महिन्याचे अनुदान देताना ही संख्या दोन कोटी ४७ लाख झाली. लाडक्या बहीण योजनेची माहिती दिली जात नाही, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे.
पहिल्याच कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतील अर्जाची पडताळणी केली जाईल, असे सांगितले. जानेवारी महिन्यात पाच लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवून दोन कोटी ४१ लाख लाडक्या बहिणींना अनुदान वाटप करण्यात आले. सरकार पडताळणी करणार असल्याने ही संख्या कमी होईल, असे वाटत असताना जागतिक महिला दिनी देण्यात आलेले फेब्रुवारी व मार्च महिन्याचे अनुदान घेणाऱ्या बहिणींची संख्या दोन कोटी ४७ लाख आहे. केसरी व पिवळी शिधापत्रिका असलेल्या दीड कोटी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असल्याने त्यांना हा लाभ मिळणार आहे.
योजनेबाबत लपवाछपवी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लपवाछपवी सुरू आहे. या योजनेची सद्यास्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला पण त्यांना योजनेची माहिती देण्यास नकार दिला गेला. माहिती केवळ मुख्यमंत्री तसेच मुख्य सचिव यांच्याकडे असल्याचे सांगून टाळण्यात आले. या योजनेची महिती देण्यास मज्जाव करण्यात आल्याचे महिती अधिकारी कार्यकर्ते संतोष जाधव यांनी सांगितले. त्यांनी या विरोधात अपिलीय अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.



