
मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाच्या दृष्टीने मंडळाच्या संकेतस्थळाची क्षमता वाढवून ते सायबर सुरक्षित करण्याबाबत सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश माहिती-तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सोमवारी दिले.
दहावी-बारावी निकालाच्या दिवशी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी संकेतस्थळाबाबत आढावा घेण्यासाठी परीक्षा मंडळ आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक शेलार यांनी घेतली. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे संचालक अनिल भंडारी आणि सचिव सुदाम आंधळे आदी बैठकीला उपस्थित होते. मंडळाच्या संकेतस्थळाची क्षमता व येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत शेलार यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. निकाल जाहीर झाल्यावर संकेतस्थळावर ताण येऊन ते क्रॅश होते. त्यामुळे संकेतस्थळाची क्षमता वाढविण्यासाठी काय करता येईल, याबाबत अहवाल तयार करण्याच्या सूचना शेलार यांनी दिल्या.



